Home विदर्भ पोळ्याच्या दिवशी कोंडवाड्यातील गोवंशाची उपेक्षा; आ. साजिद खान पठाण यांचा भाजपवर निशाणा

पोळ्याच्या दिवशी कोंडवाड्यातील गोवंशाची उपेक्षा; आ. साजिद खान पठाण यांचा भाजपवर निशाणा

 

काँग्रेस कार्यकर्त्यांसह कोंडवाड्यात पोहोचले; गोवंशांचे पूजन करून पुरणपोळी व चारा दिला

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पोळ्याच्या दिवशी शहरातील महापालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त असलेल्या गोवंशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला. गोवंशाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही संवेदनशीलता दाखवावी, अशी टीका त्यांनी केली.

 

डाबकी रोड परिसरातील श्रीवास्तव चौकाजवळील महापालिकेच्या कोंडवाड्यात मोकाट गोवंशांना पकडून ठेवण्यात आले आहे. पोळ्याच्या दिवशी जिल्ह्यात बैलांची पूजा होत असताना कोंडवाड्यातील गोवंश मात्र बंदिस्त अवस्थेत असल्याचे आ. पठाण यांनी निदर्शनास आणून दिले.

 

काँग्रेसकडून कोंडवाड्यात पूजन

 

या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर आ. पठाण यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कोंडवाड्यात भेट दिली. तेथे गोवंशांचे पूजन करण्यात आले. त्यांना पुरणपोळी व चारा देण्यात आला. त्यानंतर गोवंशांना कोंडवाड्यातून बाहेर सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

‘गौमातेच्या घोषणा नको, कृती हवी’

 

“गोवंशाबद्दल आस्था असेल तर ती केवळ घोषणांमध्ये न राहता प्रत्यक्ष कामातून दिसली पाहिजे. पोळ्यासारख्या महत्त्वाच्या दिवशी कोंडवाड्यातील मुक्या जीवांची उपेक्षा होणे ही गंभीर बाब आहे,” असे आ. पठाण यांनी म्हटले.

 

गोवंशाच्या नावावर राजकीय वातावरण तापविण्यापेक्षा त्यांच्या चारा-पाण्यासह मूलभूत गरजांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी नगरसेवक आकाश कवडे, राहुल सारवान, अभिजित तवर, अंकुश तायडे, विजय जामनिक, राम कोकाटे, ऋषिकेश जामोदे, अंकुश भेंडेकर, अजय खंडारे, साहिल तेलगोटे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!