गायीनंतर कुत्र्याचीही शिकार; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे सावट
कुशल भगत
अकोट : अकोट तालुक्यातील अकोली जहागीर आणि रुईखेड परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून शिकार केल्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गायीनंतर कुत्र्याचीही शिकार
मिळालेल्या माहितीनुसार, अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली. तर दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिवारात एका गायीवर हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतात जाण्यास शेतकरी-मजुरांची धाकधूक
सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांची शेतशिवारात मोठी वर्दळ आहे. मात्र, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतात काम करण्यासाठी जाणेही धोकादायक वाटू लागले आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळेत शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये अधिक भीतीचे वातावरण आहे.
पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांनंतर आता बिबट्या थेट मनुष्यावरही हल्ला करण्याची शक्यता निर्माण होऊ नये, यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी
अकोली जहागीर, रुईखेड परिसरातील शेतशिवाराची वन विभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, आवश्यक असल्यास पिंजरा व कॅमेरा ट्रॅप लावावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
बिबट्याचा वावर वाढण्यापूर्वीच वन विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.






