तीन दिवसीय शिवार फेरीचा उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप; २५ एकरांवरील जिवंत पीक प्रात्यक्षिकांनी वेधले शेतकऱ्यांचे लक्ष
श्रीकांत पाचकवडे
अकोला : भविष्यातील शाश्वत शेतीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन विधानसभा विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. रणधीर सावरकर यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि आत्मा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय शिवार फेरी व चर्चासत्राचा मंगळवारी उत्स्फूर्त वातावरणात समारोप झाला. यावेळी आ. सावरकर बोलत होते.
विद्यापीठाच्या शेतशिवारात गेल्या चार वर्षांपासून जिवंत पीक प्रात्यक्षिकांचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना संशोधन, सुधारित वाण, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळत असून त्याचा शेती उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी यांनी सांगितले.
दुष्काळातही बीबीएफ तंत्रज्ञान प्रभावी
विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रात बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अल्प पर्जन्यमानाच्या परिस्थितीतही या पद्धतीने लागवड केलेले सोयाबीन पीक तग धरून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत विद्यापीठाने विकसित केलेले पीक वाण आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉ. मायी यांनी स्पष्ट केले.
आ. सावरकर यांनी शिवार फेरी ही विद्यापीठाच्या संशोधन आणि विस्तार कार्यातील प्रभावी दुवा असल्याचे नमूद केले. बियाणे उत्पादन, कृषी निविष्ठा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञान व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
‘आदर्श दत्तक ग्राम’ उपक्रमाचा विस्तार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी कोरडवाहू शेतीप्रधान विदर्भासाठी शिवार फेरी अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद ही या उपक्रमाच्या उपयुक्ततेची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आदर्श दत्तक ग्राम’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठाने शेतकऱ्यांशी थेट संपर्क वाढविला असून, आगामी काळात विदर्भातील ११ जिल्ह्यांतील आणखी ११८ गावांमध्ये हा उपक्रम विस्तारण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली.
२५ एकरांवरील जिवंत प्रात्यक्षिके ठरली आकर्षण
शिवार फेरीचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या २५ एकरांच्या प्रक्षेत्रावरील जिवंत पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खरीप हंगामातील विविध पिकांच्या सुधारित जाती, विद्यापीठाच्या शिफारशींनुसार पीक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली.
गहू संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर तेलबिया, कडधान्ये, तृणधान्ये, कापूस, चारापिके, भाजीपाला आणि फुलपिकांच्या विविध जातींची प्रात्यक्षिके घेण्यात आली. कमी पाणी, कमी कालावधी आणि कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव अशा वैशिष्ट्यांसह उत्पादनक्षम वाणांविषयी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांकडून माहिती घेतली.
महिला शेतकरी, युवक-युवतींचाही उत्स्फूर्त सहभाग
शिवार फेरीत महिला शेतकरी, युवक-युवती तसेच विविध शेतकरी गटांचा लक्षणीय सहभाग राहिला. महिला शेतकऱ्यांनी विविध तंत्रज्ञानाची माहिती घेत शास्त्रज्ञांशी संवाद साधला. कृषी शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण युवक-युवतींची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. अनेक शेतकरी सहकुटुंब शिवार फेरीत सहभागी झाले.
विद्यापीठाच्या ‘मॉडेल व्हिलेज’ उपक्रमाची चित्रफीत यावेळी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.
२० हून अधिक प्रक्षेत्रांना भेट
२० ते २२ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या शिवार फेरीत २० हून अधिक प्रक्षेत्रे व संशोधन विभागांना शेतकऱ्यांनी भेट दिली. विविध कृषी तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याबरोबरच शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयक प्रश्नांवर कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी संशोधन आणि विस्तार कार्य अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यात ‘सीड, सॉईल आणि सायन्स’ या तीन ‘एस’वर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन कुलकर्णी यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तर माजी आमदार सुधीर तांबे यांनी कृषी विद्यापीठे सक्षम झाली तर शेतकरीही अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त केले.
समारोप कार्यक्रमाला सौ. दुर्गा तांबे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, अकोला महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, महा अॅग्रो व्हिजनचे महासंचालक नितीन कुलकर्णी, आत्मा अकोलाचे संचालक डॉ. मुरली इंगळे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, सहयोगी संचालक संशोधन डॉ. अनिल कोल्हे, नियंत्रक हेमंत ठाकरे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले, तर डॉ. देवानंद पंचभाई यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचे दरवाजे सदैव खुले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.






