Home Breaking News कुटासा परिसरातील शेतकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन; कपाशीचा भरीव पीक विमा आणि दुष्काळी...

कुटासा परिसरातील शेतकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन; कपाशीचा भरीव पीक विमा आणि दुष्काळी मदत तातडीने देण्याची मागणी

 

कुशल भगत

 

अकोट / कुटासा (जि. अकोला) : अकोट तालुक्यातील कुटासा मंडळातील खारपाण पट्ट्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधत राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना भरीव पीक विमा भरपाई देण्यात यावी, तसेच शासनाची दुष्काळी मदत तातडीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 

खारपाण पट्ट्यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर

 

कुटासा परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू असून ती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. हा भाग खारपाण पट्ट्यात येत असल्याने उपलब्ध भूजल खारे आहे. त्यामुळे पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरते.

 

यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कपाशीसह इतर पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. प्रतिकूल हवामान आणि पाण्याअभावी कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

 

पीक विमा व दुष्काळी मदतीची तातडीने मागणी

 

या पार्श्वभूमीवर शासनाने कपाशी पिकाच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन पात्र शेतकऱ्यांना भरीव पीक विमा भरपाई तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मिळणारी मदत कोणताही विलंब न करता DBTच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कुटासा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

निवेदन देतेवेळी अर्जुनसिंग सोळंके, शाम राऊत, किरण नवलकार, गोपाल सदाफळे, विक्रम रामागडे, प्रविण माठे, कुशल भगत यांच्यासह परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते.

Don`t copy text!