खामगाव : राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्यातील लेकीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुणे मेट्रोच्या पिंक लाईन ३ वर मेट्रो पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील प्रेरणा परमेश्वर चोपडे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, पुणे मेट्रोच्या पिंक लाईन ३ वरील पहिली प्रवासी सेवा चालविण्याचा बहुमानही प्रेरणाला मिळाला आहे. तिच्या या यशामुळे खामगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून यशाची भरारी
प्रेरणा चोपडे हिचा यशस्वी प्रवास सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. तिचे वडील परमेश्वर सुखदेव चोपडे हे खामगाव येथील नांदुरा रोडवरील गायकवाड हॉस्पिटलजवळ दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज चालवतात, तर आई छाया चोपडे यांनी कुटुंबाला खंबीर साथ दिली आहे. आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असतानाही आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि प्रेरणाने केलेली मेहनत यामुळे आज कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रेरणाने माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर निवड प्रक्रियेतील विविध टप्पे आणि आवश्यक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून तिने पुणे मेट्रोमध्ये पायलट म्हणून स्थान मिळविले.
संपूर्ण महिला पायलटची मार्गिका; पहिली प्रवासी सेवा चालविण्याचा मान
पुणे मेट्रोच्या पिंक लाईन ३ चे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गिकेवरील संचालनाची जबाबदारी महिला मेट्रो पायलट सांभाळत आहेत. या मार्गिकेचे उद्घाटन झाल्यानंतर पहिली प्रवासी सेवा चालविण्याचा बहुमान प्रेरणा चोपडे हिला मिळाल्याची माहिती आहे. ही बाब खामगावसह बुलढाणा जिल्ह्यासाठी विशेष अभिमानाची ठरली आहे.

भावंडेही अभियांत्रिकीच्या वाटेवर
प्रेरणाच्या यशस्वी वाटचालीतून प्रेरणा घेत तिची धाकटी भावंडेही अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. भाऊ मंथन चोपडे हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात, तर बहीण शिवानी चोपडे ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

आज पुणे मेट्रोच्या केबिनमध्ये बसून शेकडो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी पार पाडणारी प्रेरणा चोपडे ही केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, तर खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान बनली आहे. सर्वसामान्य परिस्थितीतूनही जिद्द, शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर मोठे स्वप्न साकार करता येते, हे प्रेरणाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.
प्रेरणा चोपडे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.






