दुष्काळामुळे रोजगार हिरावला; शेतमजुरांच्या आर्थिक मदतीसाठी शिवसेना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
श्रीकांत पाचकवडे
अकोला : दुष्काळामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून, शेतमजुरांच्या हाताला रोजगार मिळेनासा झाला आहे. रोजच्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजुरांसमोर आता दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने शेतमजुरांना वाऱ्यावर सोडू नये. शेतकऱ्यांप्रमाणेच प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला किमान २,५०० रुपयांची आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अकोला जिल्ह्यातील शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. शेतीची कामे बंद पडल्याने शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही. रोजंदारीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबांचे उत्पन्नाचे साधनच बंद झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. रोजगार नाही, उत्पन्न नाही आणि मदतीची ठोस तरतूदही नाही, अशा दुहेरी संकटात शेतमजूर कुटुंबे सापडली आहेत.
शेतकऱ्यांना मदत, मग शेतमजुरांवर अन्याय का?
शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, शेतीमध्ये प्रत्यक्ष घाम गाळणारा शेतमजूर या मदतीपासून वंचित राहिला आहे. शेतीची कामे बंद असल्यामुळे शेतमजुरांचा रोजगारही हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना शेतमजुरांचा विचार का करण्यात आला नाही, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
शेतमजूर कुटुंबांनाही संकटातून सावरण्यासाठी आर्थिक आधाराची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला किमान २,५०० रुपये तातडीने देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे प्रभावी पाठपुरावा करावा, तसेच मदतीच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, जिल्हा विशेष प्रभारी ललित नानासाहेब वानखडे, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हाप्रमुख मंगेश भाऊ काळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक आणि निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ अनसाने यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सागर भरूका, नगरसेवक मनोज पाटील, सुरेखा काळे, नगरसेविका सोनाली सरोदे, देविदास बोदळे, संजय वाडकर, रामदास हरणे, आशिष सोनवणे, किरण शिरसाट, आशुतोष शेगोकार, अनिल मालगे, मंगलाताई म्हैसने, सुनिता श्रीवास, संगीता सोनोणे, संतोष महेशने, सिंधुताई पवार, शितल गव्हाणे, जयश्री रघुनाथ तोरडमल, गजानन बोराळे, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.
अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली.






