महिनाभर शासकीय सेवांचा थेट लाभ नागरिकांच्या दारी; गावागावांत विविध उपक्रमांची धूम
श्रीकांत पाचकवडे
अकोला (Akola ): शासकीय योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अकोला जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू होत आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात शासकीय योजनांचा लाभ, विविध दाखले, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यासह रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता आणि जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
अभियानाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून अभियानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले.
‘सेवा सेतू’तून योजनांचा थेट लाभ
महसूल व वन विभागाच्या माध्यमातून ‘सेवा सेतू अभियान’ राबविले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात शिबिर घेऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच दाखले वितरित करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे.
गाव-वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’
‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमातून प्रत्येक गाव आणि वॉर्डात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्तीचे उपक्रम राबविले जातील. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी, तर शहरात मुख्याधिकारी व वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील.
‘सेवा ज्योत’ अन् शहरात बाईक रॅली
प्रत्येक गावात ‘सेवा ज्योत यात्रा’ काढण्यात येणार असून, शहरात बाईक रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
अंगणवाडी केंद्रांवर ‘अंगणवाडी उत्सव’
महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर ‘अंगणवाडी उत्सव’ आयोजित केला जाणार आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
लाभार्थ्यांच्या दारी ‘आशीर्वादाचा दिवा’
अभियानातील विशेष उपक्रम म्हणून ‘आशीर्वादाचा दिवा’ राबविण्यात येणार आहे. शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दिवा प्रज्ज्वलित केला जाणार आहे. तर ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून योजनांमुळे झालेल्या सकारात्मक बदलांच्या यशोगाथा तयार केल्या जाणार आहेत.
मानवी रांगोळीपासून पथनाट्यापर्यंत
१७ सप्टेंबर रोजी ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’ अंतर्गत मानवी रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक साहित्याचा वापर करून कला, परंपरा आणि निसर्गसंस्कृतीवर आधारित रांगोळ्याही साकारल्या जाणार आहेत.

‘नमो सेवागाथा’ उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर पथनाट्यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.
नवकल्पनांना मिळणार व्यासपीठ
कौशल्य रोजगार, उच्च व तंत्र शिक्षण, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त सहभागातून ‘इनोव्हेशन चॅलेंज’ घेण्यात येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट नवकल्पनांची निवड केली जाणार आहे.
तसेच ‘जल, जन व सेवा संकल्प यात्रा’ अंतर्गत विकासकामांबाबत नागरिकांशी संवाद साधला जाणार असून, ‘जनसेवक महाकुंभ’ कार्यक्रमात विकसित भारताबाबत लोकप्रतिनिधींचे मनोगत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
अभियानातील प्रत्येक उपक्रम प्रभावीपणे राबवून नागरिकांना शासकीय सेवांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा आणि सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.






