श्रीकांत पाचकवडे
अकोला / Akola News : अकोला महानगरपालिका उत्तर झोन अंतर्गत आकोट फैल परिसरातील रामदास मठ व मारोती मंदिर संस्थानच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी (दि. 18 जून) मनपाने निष्कासनाची कारवाई केली. अनेक वर्षांपासून काही दुकानदारांनी संस्थानच्या जागेवर अनधिकृत दुकाने उभारून जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करण्यात आली होती.
संस्थान तसेच परिसरातील नागरिकांनी संबंधित अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करून देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार अतिक्रमणधारकांना दुकाने व बांधकामासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने मनपाने कारवाईचा निर्णय घेतला.
सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात चार अनधिकृत दुकानांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी संस्थानची जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
याशिवाय आकोट फैल परिसरातील काही दुकानदारांनी रस्त्यावर उभारलेले टिनशेड, ओटे तसेच चारचाकी वाहनांमुळे झालेल्या अतिक्रमणांवरही मनपाने कारवाई केली.
या मोहिमेत आकोट फैल पोलीस ठाण्याचे ठाणेदार रहीम शेख, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, पियूष बंगाले, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गिते, आलीम काजी तसेच पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
संस्थानची जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनपाने केलेल्या या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.





