Home महाराष्ट्र FFFS App : खतासाठी आता दुकानाच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही! शेतकऱ्यांसाठी...

FFFS App : खतासाठी आता दुकानाच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही! शेतकऱ्यांसाठी आले ‘हे’ ॲप; मोबाईलवरच पाहता येणार खताचा साठा आणि करता येणार बुकिंग

श्रीकांत पाचकवडे

अकोला : खत खरेदीसाठी दुकानाबाहेर रांगेत उभे राहण्याचा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFFS App) ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील खताचा साठा मोबाईलवर पाहता येणार असून, आवश्यक खताचे आगाऊ बुकिंगही करता येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी दिली.

FFFS App

कोणत्या दुकानात कोणते खत आहे? मोबाईलवरच मिळणार माहिती

FFFS ॲपच्या माध्यमातून आपल्या परिसरातील कोणत्या खत विक्रेत्याकडे कोणते खत उपलब्ध आहे आणि त्याचा किती साठा आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे खताच्या शोधासाठी अनेक दुकानांमध्ये फिरण्याची किंवा दुकानाबाहेर रांगेत उभे राहण्याची वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

भाजपा

शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार करता येणार आगाऊ बुकिंग

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार आवश्यक खताचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे ॲपवर बुकिंग केल्यानंतर संबंधित दुकानदाराने ते खत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

बुकिंग केल्यानंतर दोन दिवसांची मुदत

FFFS ॲपवर खताचे बुकिंग केल्यानंतर पुढील दोन दिवसांच्या कालावधीत म्हणजेच T+2 मध्ये शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील प्रतिनिधी संबंधित दुकानातून बुक केलेले खत घेऊ शकणार आहे.

MRP पेक्षा जास्त दराने खत विकता येणार नाही

शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना छापील कमाल किरकोळ किंमत म्हणजेच MRP तपासणे महत्त्वाचे आहे. खताची विक्री MRP पेक्षा जास्त दराने करता येणार नाही.

‘लिंकिंग’च्या नावाखाली दुसरी उत्पादने घेण्याची सक्ती नाही

अनुदानित खतासोबत टॉनिक, औषधे किंवा इतर कृषी निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. अशा प्रकारची सक्ती झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजच मोबाईलमध्ये डाउनलोड करा FFFS ॲप

शेतकऱ्यांनी Google Play Store वरून FFFS App डाउनलोड करून या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा. खताचा साठा, आगाऊ बुकिंग आणि खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

ॲप वापरताना अडचण आली तर कुठे संपर्क कराल?

FFFS ॲप वापरताना अडचण आल्यास कृषी सखी, कृषी मित्र, पोक्रा समूह सहाय्यक, आत्मा ATM/BTM, सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि खत खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी FFFS ॲपचा वापर करावा, तसेच ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

FFFS App

Don`t copy text!