पोतदार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे नेहरू पार्क चौकात पथनाट्य; रॅलीतून दिला सुरक्षित वाहनचालनेचा संदेश
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला शहरात दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नेहरू पार्क चौक येथे पोतदार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
पथनाट्यात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघाताच्या वेळी होणारे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांनी विविध प्रसंगांच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडले. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी होऊ शकतो, तसेच हेल्मेट हा केवळ दंडापासून बचाव करण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
यानंतर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी हेल्मेट जनजागृती रॅली काढली. रॅलीदरम्यान नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले. ‘हेल्मेट वापरा, अपघात टाळा आणि सुरक्षित प्रवास करा’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील, पोतदार स्कुल च्या नीता नायर मॅडम यांच्या उपस्थितीत हा जनजागृतीपर उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हेल्मेट जनजागृती मोहिमेला विशेष स्वरूप प्राप्त झाले.






