Home सामाजिक अंगणवाडीत मृत साप; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अंगणवाडीत मृत साप; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अंगणवाडीला गोडाऊनचे स्वरूप; वाटपाचे साहित्य पडून — संबंधितांवर कारवाईची पालकांची मागणी

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव जहागीर येथील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये मृत साप आढळल्याने चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडीच्या परिसरात वाटपाचे साहित्य मोठ्या प्रमाणात पडून असल्याने या ठिकाणी गोडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

 

अंगणवाडीमध्ये साप शिरून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सापाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. साप कुजलेल्या अवस्थेत पडून होता. त्याच्या दुर्गंधीमुळे हा प्रकार निदर्शनास आला. साप जिवंत अवस्थेत असताना एखाद्या चिमुकल्याच्या संपर्कात आला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

 

पालकांच्या म्हणण्यानुसार, अंगणवाडी ही मुलांच्या शिक्षण, पोषण आणि सुरक्षित वातावरणासाठी असताना येथे वाटपाचे साहित्य पडून असल्याने जागेची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अंगणवाडीला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप होत आहे. या अव्यवस्थेमुळे सापासारखे विषारी प्राणी आत शिरण्यास वाव मिळत असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

 

साप गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडीत असल्याचा दावा पालकांकडून करण्यात येत असून, त्याचा मृत्यू होऊनही अनेक दिवस तो कुजलेल्या अवस्थेत पडून राहिला, असा आरोप आहे. दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे अंगणवाडीच्या नियमित स्वच्छतेसह मुलांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणा कितपत गंभीर आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, आपल्या पाल्यांना अशा परिस्थितीत अंगणवाडीत पाठवावे की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. अंगणवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असूनही स्वच्छता व देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

या प्रकरणात अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका तसेच ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

 

चिमुकल्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रकार गंभीर असल्याने जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग याप्रकरणी कोणती दखल घेतात, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!