अकोलेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीला आधुनिक ‘ई-बूस्ट’; खडकी ई-बस चार्जिंग स्टेशनची पाहणी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या ई-बस प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. विधिमंडळाचे मुख्य प्रतोद तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे आणि महापौर शारदाताई खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांनी खडकी येथील ई-बस चार्जिंग स्टेशनची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चार्जिंग स्टेशनच्या कामाची सद्यस्थिती, सुरू असलेल्या प्रक्रिया आणि आगामी नियोजनाची माहिती घेण्यात आली. शहरातील नागरिकांना आधुनिक व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
२५ ऑक्टोबरला ४२ ई-बसचे लोकार्पण
येत्या २५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला शहरातील ४२ ई-बसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या ई-बस सेवेमुळे अकोलेकरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप मिळण्यास मदत होणार असून, शहरातील प्रवाशांना अधिक सुसज्ज वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
पाहणीदरम्यान उपमहापौर अमोल घोगे, गटनेते पवन महल्ले, भाजप नेते रणजीत खेडकर यांच्यासह महापालिका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.






