२५ सप्टेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांसाठी सुविधा; निर्माल्य संकलनासह ज्येष्ठ नागरिकांची विशेष व्यवस्था
श्रीकांत पाचकवडे
अकोला : गणेशभक्तांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि भक्तिमय वातावरणात गणेशमूर्ती विसर्जन करता यावे, यासाठी तापडिया नगरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भारत विद्यालयासमोर, येथे भव्य कृत्रिम गणेश विसर्जन घाट उभारण्यात येणार आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या सुविधेचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीरभाऊ सावरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भाविकांसाठी सर्व सुविधांची व्यवस्था
जठारपेठ, रामदासपेठ, तापडिया नगर, राऊतवाडी, न्यू तापडिया नगर, खरप तसेच प्रभाग क्रमांक ३ आणि ६ मधील नागरिकांच्या सोयीसाठी विसर्जन घाटावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था, विधिवत पूजेसाठी स्थान आणि संगीतमय भक्तिमय वातावरणाची सुविधा राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना विसर्जन प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
भाजपा पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
सागर शेगोकार, राहुल देशमुख, हरीश काळे, बबलू जगताप, प्रशांत जोशी, हर्षद भांबेरे, सौ. निखिता देशमुख, सौ. शशिकला काळे आणि कु. नितू जगताप यांच्यासह युवाशक्ती प्रतिष्ठान मंडळ, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पेज प्रमुख तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते या उपक्रमासाठी पुढाकार घेत आहेत.
भाविकांनी सुविधेचा लाभ घ्यावा
गणेशभक्तांना विसर्जनासाठी सुरक्षित व सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध व्हावी, तसेच धार्मिक भावना आणि भक्तीची परंपरा कायम राहावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परिसरातील सर्व भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






