श्री राजेश्वर गणेश मंडळाच्या जनजागृती उपक्रमाचे वाहतूक पोलिसांकडून कौतुक
श्रीकांत पाचकवडे
अकोला : गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्याचा अनोखा उपक्रम श्री राजेश्वर गणेश मंडळाने राबविला आहे. मंडळाच्या देखाव्यातून गणपती बाप्पांच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

‘हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करा, मद्यपान करून वाहन चालवू नका, वेगमर्यादा पाळा आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका’, असा स्पष्ट संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
या उपक्रमाची दखल घेत वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंडळाला भेट दिली. यावेळी वाहतूक शाखेच्या वतीने सागर सुरेश पाली यांचे विशेष आभार मानण्यात आले.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवातून वाहतूक सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न निश्चितच लक्षवेधी ठरला आहे. ‘नियम पाळा, अपघात टाळा’ या भावनेतून नागरिकांनी वाहतूक शिस्त अंगीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शहरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि प्रत्येक नागरिकाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी गणपती बाप्पांच्या चरणी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली.






